माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Thursday, April 2, 2020

रामशेज भ्रमंती

रामशेज किल्ल्यावर केलेला पहिला ट्रेक पावसाळी होता तो आजही मला आठवतोय. आशेवाडीपर्यंत रिक्षाने प्रवास व तिथून पायपीट करत पूर्ण किल्ला पालथा घातला होता. तिथून परत माघारी येताना चांभारलेणी पायी फिरून आलो होतो. कमीत कमी दहा किलोमीटर तरी तो पायी प्रवास होता. त्यानंतर बरेचदा रामसेजवर जाणे झाले. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये व सकाळ-दुपार-संध्याकाळ या तीनही वेळेस हा किल्ला मी सर केला आहे. नाशिक पासून सर्वात जवळचा किल्ला होय. तेथे रस्त्यावर आशेवाडी गावात तो स्थित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील लढवय्या असा देदीप्यमान इतिहास या किल्ल्याला लाभलाय. रामशेज हा इतर कोणत्याही डोंगराशी जोडलेला नाही. स्वतंत्र असा मैदानी किल्ला आहे. शिवाय चढनही सोपी आहे. जास्तीत-जास्त पाऊण तासात हा किल्ला सर करता येऊ शकतो.
नाशिक जिल्ह्यात सर केलेला ज्ञानेश्वरीचा हा पहिलाच किल्ला होय. जानेवारी महिन्यात माझं आरवायके महाविद्यालयात ट्रेनिंग सेशन असल्याने नाशिकला पाच-सहा दिवसांचा आमचा मुक्काम ठरलेला होता. जानेवारी महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत आमचं आगमन नाशिकमध्ये झालं. तारीख होती एक जानेवारी २०२०. पुण्याहून नाशिकला पोहोचता पोहोचता संध्याकाळचे साडेचार वाजले होते. त्यानंतर आमचा प्रवास किल्ले सर करण्याच्या दिशेने चालू झाला. सव्वापाच वाजता पायथ्यापासून आमची सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वरी उत्साहीत होती. यावेळी तिने एकटीने चालत हा किल्ला सर केला. विशेष म्हणजे यावेळी ती पूर्णपणे माझ्याच सोबत होती! जवळपास अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आम्ही किल्ल्यावरच्या राम मंदिरापाशी आलो. सूर्य किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूने असल्याने इथपर्यंत सावलीच पडलेली होती. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर सूर्यनारायणाचे दर्शन झाले. रामशेजचा सूर्यास्त यावेळी दुसऱ्यांदा अनुभवला होता. ते भाग्य या वेळी लाभले यातच सर्वात मोठे समाधान होते. ज्ञानेश्वरीने नेहमीसारखी मस्ती याही किल्ल्यावर केली. परंतु खचलेला मुख्य दरवाजा व इतर किल्ला पूर्णपणे पाहता आला नाही. खाली येईपर्यंत पूर्णपणे अंधार झाला होता. पार्किंगच्या जागेत शेवटपर्यंत फक्त आमचीच गाडी उभी असलेली दिसली.

Wednesday, April 1, 2020

नागाव बीच

बीचवर फिरायचं याच उद्देशाने अलिबागला गेलो. परंतु समुद्राला ओहोटी असल्याने संध्याकाळी त्याचं त्याचं पाणी खूप खोल गेले होतं. त्यामुळे आलिबाग समुद्रकिनाऱ्यावर समुद्रातल्या त्या पाण्याशी भेट झाली नव्हती! त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून इथून सात किलोमीटर असणाऱ्या नागाव समुद्र किनार्‍यावर जायचे आम्ही ठरवले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता. परंतु तरीही वातावरण ढगाळ झाले होते. कालच्या ओळखीमुळे कुलाबा किल्ला पूर्ण बघता आला, त्याचे शल्य नव्हते. अलिबागच्या बाहेर आल्यावरच अस्सल कोकणी शेतीतल्या नारळाच्या बागा दिसू लागल्या. तेव्हा पुढे कोकणचा 'फील' यायला लागला होता. मागच्या त्या किनार्‍यावर मात्र तोबा गर्दी झाली होती. काल कुणालाच अलिबागला पाणी दिसले नव्हते. त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी सकाळी नागावला दिसली. बीच तसा नेहमीसारखाच, पण समुद्राला उधाण आले होते. शिवाय ढगातून अधून-मधून सूर्यदेवाचे दर्शन व्हायचे. विशेष म्हणजे खग्रास सूर्यग्रहणाचा तो काळ होता. नऊच्या दरम्यान सूर्याला ग्रहण लागणार होते. फक्त एखाद्या सेकंदाकरिता त्या खग्रास ग्रहणाकडे मी पाहिले होते. ही एक मोठी आठवण. बाकी बीच तर उत्तमच होता.
 
 

Tuesday, March 31, 2020

रेवदंडा किल्ला

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर बरेच किल्ले बांधलेले आहेत. त्यातीलच हा एक किल्ला होय. तो पोर्तुगीजांच्या काळात बांधला गेला आहे. आमच्या अलिबागच्या सफरीत या किल्ल्याला आम्ही भेट दिली. आदल्या दिवशी अलिबाग फिरून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच रेवदंड्याला पोहोचलो. अलिबागमध्ये न जाणवणारी कोकणी संस्कृती रेवदंड्याला अनुभवयास मिळाली. गाव ओलांडून बाहेर आल्यावर लगेचच किल्ल्याची हद्द चालू होते. अलिबागपासून दहा-बारा किलोमीटरवर हा किल्ला स्थित आहे. ज्यावेळी हा किल्ला बांधला तेव्हा त्याच्या भोवती पूर्ण तटबंदीचे आवरण असावे. आजही तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे. आज इथे केवळ मध्यवर्ती ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर किल्ल्याचे उरलेले व भग्न अवशेष दिसतात. इथला परिसर मात्र पूर्णपणे नारळाच्या बागांनी व्यापलेला दिसतो. बाहेरून आत किल्ला असावा, हे लवकर ध्यानात येत नाही. एका चिंचोळ्या वाटेने किल्ल्याकडे ज्याला आपण मुख्य किल्ला अर्थात बालेकिल्ला म्हणू शकतो, त्या कडे जाता येते. कितीही उन असलं तरी इथे जमिनीवर ते अतिशय मेहनतीने पोहोचतं इतकी झाडी याठिकाणी आहे. किल्ल्यावर सध्या फक्त पोर्तुगीजकालीन वास्तुरचनेचे अवशेष पाहायला मिळतात. दीपगृहासारखी केलेली रचना सध्या टिकून आहे. व त्याभोवतीची तटबंदी शाबूत असल्याचे दिसते. किल्ला म्हणावा असं येथे सध्या तरी काहीच उरलेलं नाही.Monday, March 30, 2020

थेरगाव बोट क्लब

पिंपरी-चिंचवड शहरात तसे बोट क्लब फारच कमी आहेत. त्यातील एक म्हणजे थेरगावचा बोट क्लब होय. या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने मोठे गार्डन बांधले आहे. नावीन्यपूर्ण वास्तू शैलीतील रचना या ठिकाणी पाहता येतात. पवना नदीच्या काठावर सदर बोट क्लब बांधण्यात आला आहे. त्यामुळे इथे बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीये. पावसाळ्यात वाहणाऱ्या धबधब्यांसाठी एक विशिष्ट रचना येथे पाहता येते. शिवाय फोटोग्राफीचा छंद असणाऱ्यांसाठी आपला छंद जोपासण्याचे हे उत्तम ठिकाण मानता येईल. एक दिवसाच्या कौटुंबिक सहलीचे नियोजनही करता येईल. मागील काही वर्षांपासून प्री-वेडिंग शूटसाठी या जागेचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय, असं दिसतं.Sunday, March 29, 2020

मुळशी धरणाच्या सहवासात

सन २०१९ मध्ये आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला अर्थात २६ जानेवारी रोजी आमची भेट गणपतीपुळेला होती. सहकुटुंब सहपरिवार अशी ही आमची पहिलीच कोकण भेट होती. अगदी अविस्मरणीय अशी! त्यामुळे याही वर्षी या ठिकाणी जायचे ठरवले. खरंतर ती भेट अपूर्णच राहिली होती. त्या भेटीच्या वेळेस आम्ही कोकणाच्या प्रेमात पडलो होतो. परंतु, काही कारणास्तव इतक्या लांबचा प्रवास आम्ही टाळला व जवळचे एखादे चांगले ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यासाठी अख्खा एक दिवस खर्ची पडला होता! परंतु, काहीच फलित आले नाही! शेवटी ऐनवेळी मुळशी धरणापाशी असणाऱ्या एका रिसॉर्टची माहिती मिळाली. गुगल मॅपवर पाहिले तर सदर रिसॉर्ट मुळशी धरणाच्या अगदी समोरच दिसत होते. शिवाय यंदा २६ जानेवारीला रविवार असल्याने लवकर बुकिंग करणे अपरिहार्य होते. अखेरीस आम्हालाही ग्रुपमध्ये बुकिंग मिळाले. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता पोहोचायचे होते व रविवारी सकाळी दहा वाजताचे चेकआऊट ठरलेले. रिसॉर्टचे नाव होते हझेन स्प्रिंग रिसॉर्ट आणि आमच्या एकूण जोड्या होत्या तीन. शिवाय आमची तीन पिल्लेही सोबत होती!
शनिवारी सकाळची बॅच मी घेतली व निघता निघता बराच उशीर झाला. हिंजवडीच्या रहदारी मार्गातून रस्ता काढत आम्ही मुळशीच्या वाटेला लागलो. पावसाळा संपून तीन महिने झाले होते. परंतु तरीही झाडांची हिरवाई अजून सगळीकडे तग धरून होती. वळणावळणाचे रस्ते पार करत मुळशी धरणाच्या जवळ जाऊन पोहोचलो. एका ठिकाणी वाट चुकली होती. परंतु नंतर ती दुरुस्त झाली. अखेरचा घाट हा अतिशय वळणांचा व दाट झाडीतून जाणारा होता. हाच रस्ता मुळशी धरणाच्या माथ्यावर घेऊन जाणार होता. त्यातून वाट काढत आम्ही माथ्यावर पोहोचलो. रस्त्याच्या अगदी शेवटच्या टोकावर रिसॉर्ट स्थित होते. गाडीतुन उतरल्या उतरल्या मुळशी धरणाचा अथांग सागर दृष्टीस पडला. समोरच सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता. त्याचेही प्रतिबिंब पाण्यात पडले होते. पाण्याच्या त्या विस्तीर्ण पसार्‍यात धरणाचे शेवटचे टोक काही दिसत नव्हते. आजूबाजूला होती फक्त डोंगर आणि झाडी. अतिशय दिव्य असा तो नजारा होता. स्थिर व स्तब्ध पाण्यावरून पक्षी मात्र घरी जाण्याची लगबग करीत होते. सूर्य आणखी खाली आला व डोंगराखाली जावयास निघाला तेव्हा एक सुंदर निसर्गचित्र या ठिकाणी तयार झाले होते. त्यावेळी फोटो काढण्याचा मोह मात्र कुणालाही आवरला नाही.
बर्‍याच दिवसांनी निसर्ग सृष्टीचा असा नजारा दृष्टीस पडला होता. त्यामुळे तो कित्येक काळ आमच्या आम्ही नजरेत साठवून ठेवत होतो. सूर्य मावळल्यानंतर ही तयार झालेला संधिप्रकाश सृष्टीसौंदर्याची अनुभूती देत असल्याचं दिसलं. राहण्यासाठी दोन खोल्या व एका तंबूची सुविधा केली होती. मग रात्रीची धमाल, मस्ती, गाणी अशी आमची एकंदरीत व्यूहरचना(!) होती. रात्री बारा वाजता केक कापून त्याची सांगता झाली. दुसऱ्या दिवशी सूर्यनारायण दुसर्‍या दिशेने वर आले होते. त्यामुळे धरणाचा पूर्ण परिसर सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेला दिसला. रिसॉर्टच्या इथूनच एक रस्ता धरणाच्या पाण्यापाशी जात होतात. त्या रस्त्याने मी खाली गेलो. निसर्गाची अतीव शांतता या ठिकाणी अनुभवयास येत होती. मध्येच पक्ष्यांचा कोलाहल व त्यांचे निरनिराळे आवाज ऐकू येत. असं वाटायचं तासन्तास तेच आवाज ऐकत राहावं. निसर्गाशी हितगुज करण्याची ही सर्वात मोठी संधी मला प्राप्त झाली होती. मनाची खरी शांतता या ठिकाणी लाभत असते. त्याची तुलना अन्य कशाचीही होऊ शकत नाही. लवकर आवरायचे असल्याने तिथून निघणे कमी क्रमप्राप्त होते. त्यामुळे जड पावलांनी मी तिथून काढता पाय घेतला. सकाळची आवराआवरी झाल्यावर झिपलाईन सारखा साहसी प्रकार मी पहिल्यांदाच अनुभवला. त्यानंतर तिरंदाजीचीही काही काळ मजा लुटली व आम्ही परतीच्या वाटेला लागलो. एक विस्मयकारी अनुभव त्या दिवशी आला होता. तिथून निघताना निसर्ग सृष्टीला रामराम केला... तो पुन्हा इथे येण्यासाठीच!