माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Saturday, June 23, 2012

अंजनेरी: हनुमानाचे जन्मस्थान


नाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी नाशिकजवळ अंजनेरी येथे झाला होता. अंजनेरी हा गिरीदुर्ग नाशिकपासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकमधुन त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंजनेरी गाव वसलेले आहे. बसने जायचे असल्यास खालची अंजनेरी व वरची अंजनेरी असे दोन स्टॉप आहेत. वरची अंजनेरी ही अंजनेरी दुर्गाच्या जवळ लागते.
हनुमानाच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी त्र्यंबकेश्वरपासून केवळ ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईकडून येणाऱ्यांसाठी हा रस्ता सोयीचा पडेल. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून परिचित असले तरी अंजनेरी हे पर्यटकांसाठी एक मेजवानी असणारे स्थळ आहे. इथे एकंदरीत १०८ जैन लेणी आढळून येतात. मूळ अंजनेरी गावापासून गडाकडे जाण्याकरिता एक किलोमीटर पर्यंत गडावर गाडी (दुचाकी व चारचाकी) नेता येते. नवरा-नवरी नावाच्या दोन गडसुळक्यांपासून अंजनेरी दुर्गाकडे रस्ता जातो. त्यासाठी दोन डोंगर पार करून जावे लागते. पहिल्या डोंगरानंतर अंजनीमातेचे छोटेखानी मंदीर दृष्टीस पडते. तिथुन दुसरा डोंगर ओलांडल्यानंतर भव्य पठार आहे. व शेवटी वायुपुत्र हनुमानाचे लहानसे मंदीर दृष्टीस पडते. इथवर येण्याचा मार्ग थोडासा खडतर असल्याने मारूतीचे भव्य मंदीर बांधलेले नसावे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच अंजनेरी गावात भव्य सिद्ध हनुमान देवस्थानाचे मंदीर बांधलेले आहे. बहुतांश पर्यटक व भाविक ह्या मंदीरात हनुमानाचे दर्शन घेऊनच अंजनेरी गडाच्या दर्शनासाठी पुढे जातात. सिद्ध हनुमान देवस्थानात हनुमानाची ११ फुटी ध्यानमग्न उंच मूर्ती दृष्टीस पडते.
अंजनेरी पहिल्या पर्वतावर पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्याकडे जाते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर ५ मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. दोन खोल्यांची ही गुहा आहे. इथे १० ते १२ जणांना राहताही येते. गुहेच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली दिसून येतात. समोर असणार्‍या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर वीसच मिनिटांत आपण दुसर्‍या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुद्धा प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे काही नाही. अंजनेरी गडाची भव्यता मात्र लक्षात राहुन जाते. समोरच त्र्यंबकेश्वरचा ब्रम्हगिरी पर्वत मनात घर करुन जातो. अंजनेरी गावापासून मंदीरापर्यंतचा प्रवास हा साधारणत: दोन तासांचा आहे. दुर्गभ्रमंती म्हणून जायचे असल्यास अंजनेरीला भेट देण्यास हरकत नसावी.

छायाचित्रे:
अंजनेरी पर्वत

श्री सिद्धहनुमान देवस्थान

अंजनेरी गांव

अंजनेरी येथील तलाव

अंजनीमाता मंदीर

अंजनेरी पर्वतावर पावसाळ्यात तयार होणारे तळे

अंजनेरी: दोन पर्वतांमधील खिंड

पर्वतावरील विस्तीर्ण परिसर

1 comment:

  1. blog aawadla. tumachya blogche kahi link mazya blogwar thewlet. dhanyawad.
    siddharam patil

    ReplyDelete