माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Friday, June 29, 2012

सिद्धार्थ उद्यान, औरंगाबाद

बगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच मांदियाळी एकाच ठिकाणी असणारी खूप कमी ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील महानगरपालिकांनी त्यासाठी सोयही केलेली आहे. मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद शहरात असणारे व महापालिकेने तयार केलेले सिद्धार्थ उद्यान हे एक मोठे ठिकाण आहे. बगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच स्थळे सिद्धार्थ उद्यानात पाहायला मिळतात.
औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला लागूनच महापालिकेने हे उद्यान उभे केले आहे. दोन्हींची भिंत एकच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे या ठिकाणाला पोहोचणे अगदी सोपे आहे. सुट्टीच्या दिवशी इथे मोठी गर्दी पाहायला मिळते. औरंगाबाद शहरातील नागरिक सुट्टी कुटंबासोबत घालवण्यासाठी या उद्यानाला भेट देतात. शिवाय जिल्ह्यातील अनेक शाळांच्या सहलीही इथे भेट देताना दिसत आहेत. उद्यानात प्रवेश केल्याबरोबरच भगवान गौतम बुद्धांची मोठी मूर्ती समोर दृष्टीस पडते. यावरूनच उद्यानाला सिद्धार्थ उद्यान असे नाव का दिले याचे उत्तर मिळते. मूर्तीच्या आजुबाजूच्या परिसरात बागबगिचा फुलविण्यात आला आहे. शिवाय मोठे गवती लॉन्सही आहेत. डाव्या बाजुने गेल्यास प्रथम मत्स्यालय दृष्टीस पडते. अनेक नाना प्रकारचे मासे इथे पाहायला मिळतात. मुख्य उद्यानाबरोबरच मत्स्यालय व प्राणिसंग्रहालयात प्रवेश मिळाविण्यासाठी वेगळी प्रवेश फी द्यावी लागते, हे विशेष! सर्पोद्यानासाठी मात्र प्रवेश शुल्क नाही. प्रत्येक सर्पोद्यानात दिसतात तसे सुस्त झालेले साप याही उद्यानात पाहायला मिळाले. पण, विविध प्रकारचे साप पाहून आपली ज्ञानवृद्धी होते, याचेच समाधान मानावे. भारतातील सर्व मुख्य जातीतील साप इथे पाहायला मिळतात. उद्यानात सर्वात शेवटी प्राणिसंग्रहालय आहे. उद्यानातील सर्वात मोठा भाग इथेच व्यापला गेलेला आहे. वाघ, सिंह व बिबट्याबरोबरच अनेक रानटी प्राणी येथे दृष्टीस पडतात. त्यांना मुक्त संचार करता यावा म्हणून पिंजऱ्यांचे क्षेत्रफळ अधिक करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहरात कधी जाणे झाल्यास इथे भेट देण्यास हरकत नसावी.

छायाचित्रे:

भगवान बुद्धांची मूर्ती

मत्स्यालय प्रवेशद्वार

मत्स्यालय

मत्स्यालय

लॉन्स

हत्ती कारंजा

प्राणिसंग्रहालय

प्राणिसंग्रहालय

सर्पोद्यान प्रवेशद्वार

सर्पोद्यान

 

No comments:

Post a Comment