माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, March 24, 2013

देदीप्यमान इतिहासाचा भरभक्कम साक्षीदार: अहमदनगर किल्ला.


सह्याद्रीच्या या प्रदेशात भुईकोट किल्ल्यांचे अस्तित्व तसे कमीच. मराठ्यांच्या राजवटीत गिरिदुर्गांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला व त्याच काळात या किल्ल्यांचे महत्त्वही वाढीस लागले. परिणामी भुईकोट किल्ल्यांचा महाराष्ट्राला मोठा इतिहास नाही. केवळ सपाट भूप्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भुईकोट किल्ल्यांची बांधणी करण्यात आली होती. अशाच काही अभेद्य भुईकोट किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे सुमारे पाचशे वर्षांपासून विविध रोमांचक घटनांचा साक्षीदार बनून बलाढ्यपणे उभा असलेला अहमदनगरचा ‘कोटवण निजाम’ भुईकोट किल्ला. ‘अहमदनगरचा किल्ला’ असेच या भुईकोट किल्ल्याचे प्रचलित नाव.

किल्ल्याची सध्याची भक्कम स्थिती पाहून तो पाचशे वर्षांपूर्वी बांधला असे वाटत नाही, इतक्या सुस्थितीत हा भुईकोट किल्ला आहे. अहमदनगर शहरामध्येच पूर्वेला हा किल्ला वसलेला आहे. त्याचा परीघ एक मैल व ऐंशी यार्ड असून तो आशिया खंडातील सर्वोत्तम भुईकोट किल्ल्यांपैकी एक गणला जातो. महाराष्ट्रातील बहामनी राजवटीच्या अखेरच्या काळात इ. स. 1486 मध्ये राज्याचे पाच तुकडे झाले. यातूनच विभक्त झालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने भिंगार गावाजवळ नवे शहर स्थापन करण्यास सुरुवात केली होती. सन 1490 मध्ये सिना नदीच्या तीरावर हा किल्ला बांधण्यास सुरुवात झाली. सन 1494 मध्ये त्याची बांधणी पूर्ण झाली व हा किल्ला निजामशाहीचा राजधानीचा किल्ला बनला. मलिक अहमदशहामुळेच या शहराला अहमदनगर हे नाव पडले. हा किल्ला स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानला जातो.

अहमदनगरच्या या किल्ल्यात फंदफितुरीची कारस्थाने शिजली व भाऊबंदकीची नाट्येही रंगली. अनेक तहाचे प्रसंग व शौर्याचे प्रसंग या किल्ल्याने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिले. अहमदशहा, बु-हाणशहा, सुलताना चांदबीबी यांची कारकीर्द घडवणारी निजामशाही सन 1636पर्यंत इथे नांदत होती. सन 1636 नंतर मुघल बादशहा शहाजहानने अहमदनगर किल्ल्यावर कब्जा केला. त्या काळात मुघलांचा किल्लेदार मुफलत खान अहमदनगरची बाजू सांभाळत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनाही या किल्ल्याने भुरळ घातली होती. या किल्ल्याची महती ते जाणून होते. शिवरायांच्या सैन्याने या प्रांतात तीन वेळा स्वारी केली होती. मात्र हा किल्ला जिंकण्याची महाराजांची इच्छा अपूर्णच राहिली. कालांतराने मुघल सरदार कवी जंग यांना वैयक्तिक जहागिरी प्रदान करून पेशव्यांनी हा किल्ला आपल्या पदरी पाडून घेतला. पुढे सन 1817मध्ये इंग्रजांनी अहमदनगरवर विजय मिळवला. तदनंतर 1947 पर्यंत हा किल्ला त्यांच्याच ताब्यात होता.

अहमदनगरच्या या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचा वापर अनेक राजकीय कैदी ठेवण्यासाठी बर्‍याच वेळा केला गेला. किल्ल्याच्या भक्कमतेमुळे मुघल, पेशव्यांपासून इंग्रजांपर्यंत अनेकांचे बंदिवान या किल्ल्यात कैद होते. सन 1767 मध्ये तोतया सदाशिवराव भाऊ, 1776 मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्ते तसेच चिंतो रायरीकर, नाना फडणवीस, मोरोबा दादा, बाळोबा तात्या, सदाशिव मल्हार, भागीरथीबाई शिंदे इत्यादींना या किल्ल्यात कैदी म्हणून राहावे लागले होते. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर इंग्रजांनी अनेक जर्मन कैद्यांना कैद करून ठेवण्यासाठीही या किल्ल्याचा वापर केला होता. तसेच 1942 मध्ये ‘चले जाव’ आंदोलनात इंग्रजांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची धरपकड केली. पंडित नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, गोविंद वल्लभ पंत, आचार्य नरेंद्र देव, सरदार पटेल, पंडित हरिकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी, डॉ. सय्यद मेहबूब, डॉ. वट्टामी सीतारामय्या, असफ अली, डॉ. पी. सी. घोष, आचार्य शंकरराव देव या काँग्रेस नेत्यांना या किल्ल्यात बंदिस्त केले गेले होते. चौथ्या शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यू याच ठिकाणी झाला. कैदेत असताना पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, मौलाना आझाद यांनी ‘गुबार-ए-खातिर’, पी. सी. घोष यांनी ‘हिस्ट्री ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन’ हे ग्रंथ याच किल्ल्यात लिहिले.

अहमदनगरच्या मध्यवर्ती व तारकपूर या दोन्ही बसस्थानकांपासून हा किल्ला जवळपास सारख्याच अंतरावर आहे. दोन्ही बसस्थानकांवरून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध होतात. त्यामुळे केवळ दहा मिनिटांतच किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता येते. सध्या किल्ला भारतीय सैन्यदलाच्या ताब्यात असल्याने आत त्यांचा बंदोबस्त दिसून येतो. मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला भारताचा राष्ट्रध्वज डौलाने फडकताना दिसतो. इंग्रजांनी पेशव्यांकडून किल्ला ताब्यात घेतला व किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी इंग्रज सेनापती ऑर्थर वेलस्ली याने किल्ल्याजवळील चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहारी केली होती. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ इथे चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत. जुन्या मजबूत बनावटीच्या तोफा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पाहण्यास मिळतात. किल्ल्याच्या संपूर्ण बाजूने खोल खंदक आहेत. त्या काळी या खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकड्या असत. यामुळे किल्ल्याची बांधणी सहजासहजी बाहेरून ध्यानात येत नसे. आज खंदकाच्या बाहेरच्या बाजूने सिमेंटची भिंत व त्यावर कुंपण केले आहे. पूर्वी खंदकात मगरी व सुसरी ठेवल्या जायच्या, जेणेकरून चहुबाजूंनी किल्ल्याचे संरक्षण व्हावे. या अंडाकृती किल्ल्याला एकूण 22 बुरूज आहेत. आजही ते खूप सुस्थितीत असल्याचे दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूने बुरुजांवर चढून किल्ला पाहण्यास सुरुवात करावी. याच बाजूला खाली जुन्या काळातील तुरुंग दिसून येतात. तसेच किल्ल्याचे दरवाजे आजही शाबूत असल्याचे दिसतात.   इथून बुरुजांवर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. अहमदशहाने आपल्या पराक्रमी सेनापती व कर्तबगार सरदारांची नावे या सर्व बुरुजांना दिली होती. परंतु त्यांचे उल्लेख इतिहासाच्या पानांत आढळत नाहीत.  मात्र अनेक ठिकाणी शिळांवर  फारसी, अरबी भाषेतील मजकूर दिसून येतो.

किल्ल्याच्या मध्यभागात व तटबंदीच्या आतल्या बाजूस एकूण सहा राजमहाल होते. या किल्ल्यात इंग्रजांनी एक झुलता पूल बांधला होता. आपत्तीप्रसंगी बाहेर पडता यावे, याकरिता या पुलाचा वापर होत असे. किल्ल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘नेता कक्ष’ नावाची जागा आहे. इंग्रजांनी भारतीय नेत्यांना याच ठिकाणी स्थानबद्ध केले होते. पंडित नेहरूंच्या काही वस्तू येथे पाहता येतात. तसेच काही नेत्यांच्या हस्ताक्षरातील पत्रेही या ठिकाणी संग्रही आहेत. पाचशे वर्षांच्या रोमांचक इतिहासाचा साक्षीदार असलेला अहमदनगर किल्ला खर्‍या अर्थाने महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांचा राजाच शोभतो.

Published in daily Divya Marathi dated: 17th March  2013
मूळ लेख: लिंक.

No comments:

Post a Comment