माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, April 30, 2013

लालमभूत ठरलेल्या लळिंग !

Fort Laling
बागलाण व खानदेशाच्या सीमारेषेवर लळिंग हा किल्ला उभा ठाकलेला आहे. आमेर हा खानदेशातील सर्वात उंच किल्ला आहे. त्यानंतर लळिंगच्या किल्ल्याचा क्रम लागतो. उत्तर महाराष्ट्रातील सुंदर किल्ल्यांपैकी हा एक किल्ला. केवळ मुघल वा पेशवाईचाच नव्हे तर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लळिंग किल्ल्याला लाभले आहे.

मध्ययुगीन कालखंडात लळिंग ही खानदेशाची राजधानी होती. मुघल साम्राज्याचा विस्तार बागलाण व खानदेशात झाल्यावर लळिंग हे त्यांचे मुख्य लष्करी केंद्र म्हणून उदयास आले. इ.स. 1370 ते 1399 या कालखंडात फारुखी घराण्यातील राजा मलिक याच्याकडे लळिंगचा ताबा होता. त्याच्या पश्चात त्याचा मुलगा मलिक नसीरखान याच्या अधिपत्याखाली लळिंगचा परिसर आल्यावर हा भाग फारुखी राजवटीचे सत्ताकेंद्र बनला. नसीरखानने असिरगड जिंकून तेथे बु-हाणपूर नावाचे शहर वसवले व इ. स. 1400मध्ये त्याला राजधानीचा दर्जा दिला. परंतु, सन 1435मध्ये बहामनी सुलतानाने नसीरखानाचा पराभव केला. बु-हाणपुरात दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. पराभवामुळे नसीरखान पुन्हा लळिंगला परतला. बहामनी सुलतानाने मात्र नसीरखानाचा पाठलाग करून लळिंग गाठले. बहामनी सुलतानाला लळिंगमध्ये मोठी संपत्ती मिळाल्याने तो ती घेऊन बिदरला निघून गेला. तशातच लळिंग किल्ल्यावर नसीरखानाचा 1437मध्ये मृत्यू झाला. इ.स. 1601मध्ये फारुखी घराण्याचे राज्य संपवून मुघलांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. इ.स. 1632मध्ये मालेगावजवळील गाळणा किल्ला मुघलांच्या अधिपत्याखाली येताना झालेली शिष्टाई याच लळिंग किल्ल्याच्या साक्षीने झाली!

इ. स. 1752मध्ये मराठा सैन्याने निजामाचा पराभव केला. त्यामुळे मराठी साम्राज्यात मल्हारराव होळकरांच्या अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालत असे. इ.स. 1818मध्ये मराठी सैन्याचा इंग्रजांकडून पराभव झाल्याने लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला व संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्याची इंग्रजांनी नासधूस केली होती. सन 1930मध्ये गांधीजींनी देशभर सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केली होती. त्याला पाठिंबा म्हणून लळिंगच्या पायथ्याशी हजारो भिल्ल व आदिवासी भूमिपुत्रांनी जंगल सत्याग्रहाची घोषणा केली. जंगलातील लाकूड व गवत कापून विकायचे नाही, हे इंग्रज सरकारचे धोरण त्यांनी मातीस मिळवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच लळिंग किल्ल्याच्या पायथ्याला 31 जुलै 1937रोजी स्त्रियांची सभा घेऊन ‘अंधश्रद्धा मोडा व आपल्या मुलांना शिकवा’ हा संदेश दिला होता. अशा विविध घटनांचा साक्षीदार लळिंगचा किल्ला आहे.

लळिंग हे गाव धुळ्यातून जाणा-या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर वसलेले आहे. त्याचे धुळ्यापासून अंतर नऊ कि.मी., जळगावपासून 100 कि.मी., मालेगावपासून 40 कि.मी. व नाशिकपासून 146 कि.मी. आहे.  लळिंग गावामध्ये काळ्या पाषाणात बांधलेले महादेवाचे एक छोटे मंदिर आहे व त्यामागे एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खालूनच किल्ल्याकडे जाण्याची वाट चालू होते. स्थानिकांची व विशेषत: मेंढपाळांची येथे नियमित ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट ही मळलेली आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर किल्ल्याच्या पाय-यांचे भग्न अवशेष दिसून येतात. पावसाच्या पाण्याच्या रेट्याने ते अस्ताव्यस्त पडले असावेत, असे लक्षात येते. साधारणत: अर्ध्या तासाच्या चढाईनंतर दगडात बनवलेल्या काही पाय-या लागतात. त्या चढून गेले की, समोरच एक थडगे व शेवाळलेले टाके दिसते. येथून डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना जाण्यासाठी रस्ते आहेत. डाव्या बाजूचा रस्ता हा फसवा आहे. तो पडझडीमुळे चुकीचा मार्ग दर्शवतो. हा रस्ता तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जातो. उजव्या बाजूचा रस्ता खालच्या तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. याच वाटेमध्ये चार-पाच कातळात कोरलेली दालने दिसून येतात. पाणी साठवण्यासाठी वा राहण्यासाठी या गुहांचा वापर होत असावा. सध्या ती पूर्णपणे कोरडी पडली आहेत. मात्र पावसाळी मोसमात त्यात ब-यापैकी पाणी भरले जात असावे.

ही टाकीसदृश गुंफा मागे पडल्यावर आपण चालत या किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. सध्या तो पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक व्याघ्रशिल्प कोरलेले दिसते. येथून वर गेल्यावर उजव्या बाजूला गडाची तटबंदी दिसून येते .आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलेलो असतो. गड पायथ्यापासून चढताना सतत एक सज्जाची कमानीयुक्त भिंत दिसत राहते. ही भिंत याच ठिकाणी दृष्टीस पडते. विटांचा व चुन्याचा वापर करून ती उभी केलेली आहे. समोरच नव्याने ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्याच्या पलीकडून मुंबई-आग्रा महामार्ग व धुळे शहराचे दर्शन होते. वातावरण स्वच्छ असताना सोनगीरचा किल्लाही येथून दिसतो.

तटबंदी पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर डाव्या बाजूच्या वाटेने किल्ल्याच्या दुस-या भागाकडे जाता येते. रस्त्यात कातळात तयार केलेली एक पाण्याची टाकी आहे. त्यात उन्हाळ्याच्या ब-याच काळापर्यंत पाणी साठलेले असते. परंतु हे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. पुढच्या भागात व किल्ल्याच्या मुख्य पठारावर आणखी काही पाण्याची टाकी कातळात तयार केल्याची दिसतात. पठारावर मध्येच काहीसा उंचवटा आहे. काही ठिकाणी राहत्या घरांचे पडीक अवशेष नजरेस पडतात. या पठाराच्या चहुबाजूंनी तटबंदी बांधलेली आहे. मध्य टेकाडाच्या पोटात काही गुहा खोदलेल्या आहेत. अशा गुहांची संख्या मात्र या किल्ल्यावर बरीच दिसून येते. समोरच एक दारू कोठाराची इमारत दृष्टीस पडते. त्याच्या मागच्या बाजूला   पाण्याचा मोठा खंदक व तीन-चार टाकी आहेत. समोरच दुर्गा मातेचे एक छोटेखानी मंदिर आहे. लळिंगच्या किल्ल्यावर कधी राहण्याची वेळ आली तर या मंदिराचा वापर करता येतो. परंतु, येथे केवळ दोनच जण राहू शकतात. समोरील पाण्याच्या टाक्यांना लागून एक कुंड आहे. त्यातही पाणी साठलेले असते. किल्ल्यावर येणारे मेंढपाळ जनावरांना पाणी पाजण्यासाठी या कुंडाचा वापर करतात.

मंदिराच्या मागील बाजूस पुन्हा काही कोरलेल्या गुहा दिसून येतात. या गुहांनी बरीच मोठी जागा व्यापलेली आहे. एका गुहेपाशी एक भुयार आहे. हे भुयार थेट गडाच्या गुप्त दरवाजापाशी येऊन मिळते. या दरवाजापासून खाली कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला एक वाट जाते. वाटेत देवीचे एक पडके मंदिर दिसते. येथूनच लळिंगच्या मुख्य माचीकडे वाट जाते. किल्ल्याच्या मुख्य बुरुजावरूनही ही माची स्पष्ट दिसून येते. माचीवर एक पाण्याचा भव्य तलाव आहे. समोरच एका घुमटीच्या खाली पाण्याची दोन टाकी आहेत. माचीचा परिसर पाहून झाल्यावर दुस-या बाजूची वाट पुन्हा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाते. येथून पुन्हा खाली मार्गस्थ होता येते. लळिंगचा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 मी. उंच असल्यामुळे तो सर करताना वा उतरताना थकवा कधी जाणवत नाही.

Original Article: http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-atractive-fort-4248653-NOR.html

Sunday, April 14, 2013

पारोळ्याचा भारदस्त भुईकोट

  इतिहासातील नोंदींवरून पारोळा हे गाव 260 वर्षांपूर्वी भुईकोट किल्ला बांधणीच्या वेळी अस्तित्वात आले असावे असे दिसते. जहागिरदार हरी सदाशिव दामोदर यांनी पारोळा किल्ला इ.स. 1727मध्ये बांधला. त्या वेळी किल्ल्याच्या परिसरात 50 घरांची पेंढारांची वस्ती होती. आजही पारोळा गावचा एक भाग पेंढारपुरा म्हणून ओळखला जातो. किल्ला बांधणीमुळेच पारोळा गावाचे व्यापारीदृष्ट्या महत्त्व वाढीस लागते. शिवाय किल्लेदारांनी व्यापा-यांना उदारमनाने आश्रय दिल्याने पारोळा गाव भरभराटीस आले. म्हणूनच पेशव्यांचे सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारी पेठ म्हणून नावारूपास आली. इ. स. 1818मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केल्याने मराठा साम्राज्य धोक्यात आले. महाराष्ट्रावर इंग्रज सत्ता स्थापन होऊ लागली. इ. स. 1821मध्ये पारोळे गावी व आजूबाजूच्या परिसरात इंग्रजांविरुद्ध ठिकठिकाणी बंड होऊ लागले. ब्रिटिश कॅप्टन ब्रिग्ज याच्या खुनाचा प्रयत्न झाला. इंग्रजांनी चवताळून प्रतिहल्ला केला व जहागिरदारांना किल्ला सोडण्यास भाग पाडले. 1857च्या उठावात राणी लक्ष्मीबार्इंना मदत केल्याचा ठपका पारोळ्याच्या किल्लेदारावर ठेवण्यात आला होता. 1859मध्ये इंग्रजांनी पारोळा किल्ला व शहर ताब्यात घेतले. याच काळात किल्ल्यामध्ये इंग्रजांनी अनेकांना फाशी दिले. शिवाय द्रव्य मिळवण्यासाठी किल्ल्याची बरीच मोडतोडही केली. त्या घटनांचे भग्न अवशेष किल्ल्यात आजही शाबूत आहेत.

पारोळा गाव एका विशिष्ट ठेवणीतील चौकोनात वसले आहे. त्याचे रस्ते सरळ लांब रेषेत आहेत. याच रस्त्यांवर अधूनमधून पिंपळाचे व लहान लहान देवतांचे पार एका रांगेत बांधलेले दिसून येतात. याच वैशिष्ट्यामुळे या गावाला पारांच्या ओळी अर्थात ‘पारोळी’ व अपभ्रंश होऊन ‘पारोळा’ हे नाव पडले. या गावाला चारही बाजूंनी तटबंदी होती. या तटबंदीला सात दरवाजे होते. त्यातील दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील व मुख्य दरवाजा. अन्य दरवाजांची नावे धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, पीर दरवाजा व अंमळनेर दरवाजा अशी आहेत.

पारोळा हे धुळे शहरापासून 30 व जळगावपासून सुमारे 55 किमी. अंतरावर आहे. या दोन्ही शहरांपासून पारोळ्याला येण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय धुळे व जळगावच्या अन्य तालुक्यांच्या ठिकाणांना पारोळी गाडीमार्गाने जोडलेले आहे. बसस्थानकावर उतरल्यावर केवळ दहाच मिनिटांच्या अंतरावर पारोळा किल्ला स्थित आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येत असल्याने तो शहराच्या आजच्या बाजारपेठेत मुख्य ठिकाणी वसलेला आहे. किल्ल्याभोवती सध्या बाजारपेठेचेच अतिक्रमण झाले आहे. चालत चालत या बाजारपेठेतून मार्ग शोधावा लागतो. किल्ल्यापासून पाचच मिनिटांच्या अंतरावर राणी लक्ष्मीबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत.

पारोळा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. ते ओलांडल्यावर आत आणखी एक प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वाराच्या बाजूने किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. सध्या या दोन्ही भिंतींच्या मध्ये बराच कचरा टाकलेला दिसतो. आतल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पहारेक-यांच्या देवड्या नजरेस पडतात व समोरच मुख्य किल्लाही दिसतो. अन्य भुईकोट किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची बांधणी रेखीव आहे. तो साधारण 160 मीटर लांब व 130 मीटर रुंद आहे. किल्ल्याच्या मध्यभागी मुख्य किल्ला अर्थात बालेकिल्ला दिसून येतो. सध्या या ठिकाणची निगा पुरातत्त्व विभाग घेत असल्याने अनेक ठिकाणी पुनर्बांधणीची कामे झाल्याची दिसून येतात. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहण्यास सुरुवात करणे सोईस्कर ठरते. किल्ल्याच्या अनेक कमानी येथून पुढे दिसून येतात. परंतु त्यांची पडझड झालेली आहे. एका कमानीजवळ चौकोनी विहीर आहे. त्यात पावसाळ्यात ब-यापैकी पाणीसाठा होतो. आतील तटबंदीवर चढण्यासाठी पाय-याही आहेत. या पाय-यांनी वर गेल्यास पारोळा गावाचे दर्शन होते. पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस एक तलाव आहे. अशा प्रकारच्या पाणीसाठ्याची रचना बहुतांश भुईकोट किल्ल्यांना दिसून येते. परंतु हा तलाव ब-यापैकी मोठा आहे. आज त्यावर अतिक्रमण झाल्याने तो बाहेरच्या बाजूने दिसून येत नाही व आतल्या बाजूने पाहिल्यास त्यावर बाटल्या व इतर प्लॅस्टिकचा कचरा तरंगताना दिसतो. या तलावात उतरण्यासाठी तटबंदीला दोन मार्गही आहेत. परंतु या भागात झाडे उगवल्याने हा रस्ता जवळपास बंदच झाला आहे.

बालेकिल्ल्याच्या अलीकडे एक टुमदार घर नजरेस पडते. दारूगोळा ठेवण्यासाठी त्याचा वापर होत असावा. या घरात सूर्यप्रकाश व चंद्रप्रकाश व्यवस्थित पोहोचावा याकरता झरोक्यांची व्यवस्थित रचना केलेली आहे. या घराजवळच व पूर्वेच्या तटबंदी शेजारी एक महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराजवळ एक मोठे भुयार असून त्याचा वापर जुन्या काळापासून होत असे. विशेष म्हणजे, या भुयारातून घोडेस्वार आत जात असे, असे स्थानिक रहिवाशी सांगतात. या भुयाराचे दुसरे तोंड आठ किलोमीटरवरील नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे म्हटले जाते. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता. महादेवाच्या मंदिराच्या पुढे किल्लेदाराच्या वाड्यांचे अवशेष दिसून येतात. या इमारती दुमजली आहेत. पूर्वेची तटबंदी संपते त्या ठिकाणी ध्वजस्तंभ दिसून येतो. या ठिकाणापासून पूर्ण बालेकिल्ला नजरेस पडतो.

पारोळ्याच्या बालेकिल्ल्याला चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. त्यांची उंची साधारणत: पंचवीस फूट असावी. इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल,   या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूने सौंदर्य नष्ट झाले आहे. बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे जवळच्या चोर दरवाजाने वर प्रवेश करावा लागतो. वर गेल्यावर पूर्ण किल्ल्याचे चहूबाजूंनी दर्शन घेता येते. पुरातत्त्व खात्याने बरेच पुनर्बांधकाम केल्याने येथील अवशेष सुस्थितीत असल्याचे दिसतात. दक्षिणेच्या तटबंदीला लागून तीन पडक्या घरांचे अवशेष नजरेस पडतात. किल्ल्याच्या कचे-या याच ठिकाणी कार्यरत होत्या. कचे-यांच्या भिंतींवर बाहेर पाहण्यासाठी जंग्यांची रचना केली आहे. अशाच जंग्या तटबंदीवरही दिसून येतात.

बालेकिल्ल्यावरून उतरण्यासाठी पश्चिमेकडे एक दरवाजा आहे. तो आज बंद स्थितीत दिसून येतो. सध्या पारोळ्याच्या या भुईकोट किल्ल्याची डागडुजी चालू आहे. वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहता येते. झाशीच्या राणीच्या वास्तव्याने हा किल्ला तिनेच बांधला, अशीही स्थानिकांची समजूत आहे. राणीच्या माहेरचे वंशच आजही पारोळा गावात राहतात. पारोळ्याचा हा किल्ला जळगाव जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण आहे. परंतु अतिक्रमणाने त्याचे सौंदर्य धोक्यात आले असून ते टिकवण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

प्रसिद्धी: दै. दिव्य मराठी.
दि. १४ एप्रिल २०१३.
मूळ लेख इथे वाचा.

Sunday, April 7, 2013

डुबेरे गड

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे गड वसलेला आहे. नाशिकपासून सुमारे ३५ किलोमीटर व सिन्नरपासून आठ किलोमीटर अंतरावर हा डोंगर आहे. गूगल मॅप्सवर याच्या मार्गाची माहिती मिळू शकेल. सिन्नर-घोटी मार्गावर सिन्नर पासून सुमारे पाऊण ते एक किमी अंतर गेल्यावर डावीकडे जाण्याकरिता एक रस्ता लागतो. हा रस्ता जिल्हामार्ग या प्रकारात येत असला तरी खूप चांगल्या स्थितीत आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुंना बऱ्यापैकी झाडी आहे. त्यामुळे प्रवास सुखद वाटतो. डुबेरे गांव चालू झाल्यावर सुरूवातीलाच उजवीकडे डुबेरे गड दिसून येतो. गांवातून तिथवर जाण्याचा रस्ता मात्र खडकाळलेला आहे. पावसाच्या पाण्याने कदाचित त्याची तशी अवस्था झाली असावी! गडाच्या पायथ्याशी एक महादेवाचे मोठे मंदिर आहे. आत मोठे शिवलिंग दिसून येते. मंदिराच्या उजव्या बाजुने एक पायऱ्यांची वाट डुबेरे गडाच्या दिशेने जाते. हा रस्ता अगदी अलिकडच्या काळात बांधला असावा. पावसाळ्यात डुबेरेचे वातावरण अगदी सुखद अनुभव देऊन जाते. गडाच्या माथ्यावर जाण्यास पंधरा मिनिटे पुरतात. बहुतांश ठिकाणी ऍल्युमिनियमचे रेलिंग्ज टाकल्याचे दिसून येतात. गडमाथा हा एक पठारच आहे. त्याच्या मध्यभागी एक सप्तशृंगी मातेचे मंदिर बांधलेले आहे. दोन ठिकाणी पाण्याची टाकी दिसून येतात. गडाच्या माथ्यावरून सिन्नर शहराचे तसे नाशिकचेही दर्शन घडते. नशिकच्या पांडवलेणी व विहितगांव या भागातून डुबेरे गड सहज दिसतो. इगतपुरी रांगेतील बहुतांश किल्ले डुबेरे वरून दिसतात. सह्याद्रीची ही पूर्ण रांग लांबपर्यंत दिसून येते. नाशिकहून दोन-तीन तासांचा छोटा ट्रेक करण्यासाठी डुबेरे हे एक चांगले ठिकाण आहे.

डुबेरे कडे जाण्याचा मार्ग (सिन्नर मधून)
छायाचित्र:

डुबेरे गड

डुबेरे गड

मंदिरातून दिसणारा डुबेरे

माथ्यावर फडकणारा भगवा.

सप्तशृङ्गि मंदिर.

डुबेरे गडावरील ध्यानस्थ कर्मयोगी- भूषण घोलप.

चढतॆच्या पायर्या

शिवलिंग 

दुबेरेचे कडे

गडावरील पाण्याची टाकी

Wednesday, April 3, 2013

त्र्यंबकगड : पुराणकाळाचा भक्कम साक्षीदार

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणा-या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड होय. हा किल्ला त्र्यंबक या नावापेक्षा ‘ब्रह्मगिरी’ या नावाने अधिक सुपरिचित आहे. ऐतिहासिकतेपेक्षा पौराणिक महत्त्व या गडाला अधिक असल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सह्याद्रीची एक डोंगररांग गेली आहे. या रांगेस त्र्यंबकरांग असे म्हणतात. ब्रह्मगिरी, अंजनेरी, बसगड, उतवड यासारखे गडकोट या रांगेत उभे आहेत. यातील ब्रह्मगिरी हा सर्वात मोठा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व तर आहेच, शिवाय पर्यटकांच्या दृष्टीने ब्रह्मगिरी ही एक पर्वणीच मानली जाते.

तेराव्या शतकात त्र्यंबक किल्ला व परिसरात देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. कालांतराने हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. नंतर निझामशाही, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मुघल अशा राजवटींत या किल्ल्याचे हस्तांतरण झाले. मुघल इतिहासकारांनी या किल्ल्याचा ‘नासिक’ असाच उल्लेख केला आहे. सन 1670मध्ये शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती संभाजी राजांच्या   काळात राधो खोपडे हा फितूर झाल्याने मुघलांनी त्र्यंबकगड मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सन 1689 पर्यंत हा किल्ला छत्रपती संभाजी राजांच्याच ताब्यात होता. त्र्यंबकेश्वर हे त्र्यंबकगडाच्या पायथ्याचे ठिकाण होय. चहुबाजूंनी पर्वतांच्या वेढ्यात हे गाव वसलेले आहे. नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वर सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकच्या मेळा बसस्थानकावरून राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांची येथे सतत ये-जा चालूच असते.

शिवाय नाशिकहून पालघर, जव्हार, वाडा या ठिकाणी जाणा-या सर्व बसेस त्र्यंबकेश्वर मार्गे जातात. त्र्यंबकेश्वर
बसस्थानकापासून दहा मिनिटांत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचता येते. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने त्र्यंबकगडाच्या पायथ्याजवळ ‘संस्कृती रिसॉर्ट’ बांधलेले आहे. या रिसॉर्टपासून गडाच्या दिशेने दोन वाटा जातात. दोन्हीही वाटा या पाय-यांच्या आहेत. उजव्या बाजूच्या वाटेने गंगाद्वारापाशी पोहोचता येते, तर डावी वाट थेट गडाच्या दिशेने जाते.

गंगाद्वाराच्या वाटेने वर गेल्यावरही पुन्हा त्र्यंबकगडाकडे जाण्यासाठी पायवाट तयार केलेली आहे. प्रत्यक्ष गडाच्या दिशेने जाण्याकरता मात्र डाव्या बाजूच्या रस्त्यानेच जाणे योग्य ठरते. पावसाळ्यात येथील संपूर्ण परिसर हिरव्या वनराईने नटलेला असतो. त्र्यंबक गडावर येण्याचा रस्ता पाय-यांनी बनवलेला असल्याने फारसा अवघड भासत नाही. चालता चालता रस्त्यात ठिकठिकाणी छोटी मंदिरे दृष्टीस पडतात. सुमारे एक तास पाय-या चढत गेल्यावर किल्ल्याचे मुख्यद्वार लागते. यापुढील पाय-या या कातळात कोरलेल्या आहेत. अखंड दगडांत बनवलेल्या पाय-या पाहता सातवाहनांच्या गडरचनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय कुशलतेने या पाय-यांची रचना दगडांमध्ये करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पाय-या खोलवर असल्याने अंधार जास्त होतो. पाय-या संपल्यावर किल्ल्याचे प्रशस्त पठार नजरेस पडते. पूर्ण त्र्यंबकेश्वर गावाचे दर्शन या ठिकाणाहून व्यवस्थित करता येते. किल्ल्याचे कडे अतिशय भक्कम आहेत. येथूनच पाय-यांच्या बाजूने समोरच्या दिशेला अंजनेरी गड दृष्टीस पडतो. वातावरण स्वच्छ असताना रामशेज व देहेरच्या किल्ल्याचेही दर्शन होते. किल्ल्याचा माथा प्रशस्त असला तरी ‘किल्ला’ म्हणावा असे जास्त अवशेष येथे शिल्लक राहिलेले नाहीत. काही ठिकाणी सपाट प्रदेशावर राहत्या घरांचे प्राचीन अवशेष दिसून येतात. त्या ठिकाणी कोणी फिरकत नाही. हा किल्ला दोन्ही बाजूंनी प्रचंड विस्तारलेला आहे. उजव्या बाजूच्या टोकाला काही ठिकाणी पडलेली तटबंदी नजरेस पडते. या ठिकाणी जाण्याची वाट अवघड असल्याने इथे फिरकणा-यांची संख्या तशी कमीच आहे. सरळ उभे ठाकलेले कडे गडमाथ्यावरून न्याहाळता येतात. गडमाथ्याचा एक उंचवटा पार केल्यावर मागच्या बाजूला गडावरील गोदावरी उगमस्थान, गंगा-गोदावरी मंदिर व जटा मंदिर नजरेस पडते. समोरच्या पर्वतरांगांमध्ये हरिहर किल्ला डौलाने उभा असलेला दिसून येतो. अनेक ट्रेकर्स त्र्यंबक ते हरिहर असाही ट्रेक आयोजित करतात. ही वाट पर्वतांच्या एका खिंडीतून जाते. त्र्यंबक पठारावरील पाय-यांच्या वाटेने मध्येच एक नवी वाट डावीकडे ‘सिद्धगुंफा’ या ठिकाणी जाते. कड्यात कोरलेली गुहा या ठिकाणी पाहता येते. उजवीकडील रस्त्यावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. गंगा-गोदावरी मंदिरात गोदावरीचा प्रवाह पाहता येतो. या मंदिराच्या शेजारी एक बारमाही पाण्याचे टाके आहे. प्राचीन काळापासून या टाक्याचा वापर पाणी साठवण्याकरता होत असावा, असे दिसते.  जटा मंदिराच्या मागच्या बाजूला असणा-या टेकडीच्या पलीकडे त्र्यंबक किल्ल्याचा मुख्य बुरूज आहे. परंतु त्याचीही पडझड झाली आहे. त्र्यंबकवरून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी वर्दळ येथे दिसून येते, तर इतर वेळेस शिवभक्त या पर्वतावर गंगा-गोदावरीचे दर्शन घेण्यासाठी येतात. एका अर्थाने या गडामुळे नाशिक जिल्ह्याचे  ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व अधोरेखित होत जाते.
tushar@tusharkute.com

प्रसिद्धी: दै. दिव्य मराठी (दि. ०३ फेब्रुवारी २०१३).
मूळ लेख: लिंक.