माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Saturday, November 19, 2016

भ्रमंती [मीनेश्वर मंदिर]

साधूचं कूळ अन नदीचं मूळ शोधू नये असं म्हणतात. साधूच्या मूळाबद्दल माहिती नाही पण नदीच्या मूळ शोधण्याची आम्हाला भारीच हौस. त्याची सुरूवात नाशिकच्या गोदावरीपासून आम्ही केली होती. त्यानंतर नद्यांची उगमस्थाने शोधण्याचा धडाकाच लावला.  जुन्नरच्या कुकडी व पुष्पावतीनंतर आता मीनी नदीचा क्रमांक लागला. परवा तांबेवरून घंगाळदऱ्याकडे जाताना एका बाबांना लिफ्ट दिली होती तेव्हा त्यांनी या उगमस्थानाविषयी माहिती दिली. मग माझा प्रवास सुरू झाला. जुन्नरच्या चतुर्गंगांमधील मीना ही कुकडीनंतरची दुसरी मोठी नदी. इतिहासाच्या एका पुस्तकात शिलाहार राजा झंझ याच्या विषयी माहिती वाचली होती. गोदावरीपासून भीमेच्या खोऱ्यापर्यंत झंझाने बारा विविध नद्यांच्या उगमस्थानी बारा विविध शिवालये बांधली होती. यातील आज अनेक हेमाडपंथी शिवालये सुस्थितीत आहेत तर काही शेवटची घटका मोजतायेत. अहिल्यातीर्थ, रत्नेश्वर, हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वर, कुकडेश्वर अन भीमाशंकर ही यातील नावाजलेली शिवालये होत. मीना नदीच्या काठावर ब्रह्मनाथाच्या मंदिराचा संदर्भ आहे. प्रत्यक्षात पारूंडे येथे असणारे हे शिवालय मीना नदीच्या एका डोंगराच्या पलिकडे आहे. त्यामुळे राजा झंझनेच हे मंदिर बांधले आहे का, याविषयी माझ्या मनात संभ्रमच आहे.
परवा मीनेश्वर मंदिराविषयी समजले तेव्हा मी लगेचच त्या दिशेने कूच केली. आंबोली हे पुणे जिल्ह्यातले शेवटचे गांव. चहुबाजुंनी पर्वतांनी वेढलेले हे गांव आंबोली धबधबा, ढाकोबा अन दाऱ्याघाट या तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या गावात येतो तेव्हा नुसतं पायी इथल्या डोंगर दऱ्यांमधून फिरायचा मोह आवरत नाही. आंबोलीच्या अलिकडे एक रस्ता उजवीकडे डोंगराच्या दिशेने जातो. अगदीच कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने पुढे गेल्यावर कड्यांच्या पायथ्याशी मीनेश्वर महादेवाचे अलिकडच्या काळात बांधलेले छोटेखानी मंदिर आहे. कुकडेश्वराची प्रतिकृतीच ती! फरक इतकाच मीनेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीत मोडत नाही. मागच्या कोकणकड्याच्या त्या गर्द झाडीतून झुळझुळ वाहणारे ते स्वच्छ पाणी एका नंदिमुखातून पुढे जाताना दिसते. डोंगराच्या माथ्यावरून एका औदुंबराच्या मुळापासून या पाण्याचा उगम होतो. अतिशय शांतता असलेला हा परिसर केवळ नदीच्या पाण्याच्या आवाजाने निसर्गसंगीत निर्माण करत बसलाय...
No comments:

Post a Comment