माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, January 11, 2017

भ्रमंती- शहाजी सागर जलाशय

’शहाजी सागर’ म्हणजे कुकडी नदीवरचा पहिला जलाशय होय. पूर गावात उगम पावल्यावर ही नदी माणिकडोहाच्या या जलाशयात प्रवेशते. उसरान, उंचरान, उंडेखडक, हडसर, माणकेश्वर, तेजूर, राजूर, केवडी ही गावे या जलाशयाच्या काठावर वसलेली आहेत. चहुबाजुंनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांत तो स्थित आहे. त्यामुळेच शांत व नितळ जल अनुभुति इथे मिळते. एखाद्या नागमोडी वळणाच्या अजस्त्र नदीसारखा हा जलाशय १९८४ मध्ये बांधला होता. काठावरच्या कोणत्याही गावातून गेले तरी पाण्यापर्यंत जाता येते. शिवाय धरणाच्या दोन्ही बाजुंना छोटेखानी घाटरस्ते आहेत. त्यादिवशी सकाळच्या कडाक्याच्या थंडीत या जलाशयाचे देखणे रूप पाहावयास मिळाले.
नाणेघाट ते जुन्नरच्या मुख्य मार्गावर हा जलाशय स्थित आहे. शिवजन्मभूतीत असूनही त्यास शहाजी राजांचे नाव देण्यात आले आहे. कारण, बऱ्याच काळापर्यंत शहाजी राजांचा निवास या भागाला लाभला होता. उगमस्थानाच्या पलिकडे असणाऱ्या जीवधन किल्ल्यावरून शहाजी राजांनी छोट्या मुर्तिजा निजामाला घेऊन तीन वर्षे निजामशाही चालवली होती. त्यामुळेच कदाचित या जलाशयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.