माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, August 29, 2018

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान : किल्ले देवगिरी

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान औरंगाबादच्या देवगिरी किल्ल्याच्या इतिहासाने लिहिलं गेलंय. आज आपल्या राज्यात बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला हा एक दुर्ग... किल्ला कसा असावा, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून देवगिरी किल्ल्याकडे पाहता येईल. आठशे वर्षे अन अनेक लढाया पाहिलेल्या ह्या छोटेखानी दुर्गात अनेक रहस्ये दडली आहेत! परकीय आक्रमकांनी या किल्ल्याचे नाव कालांतराने बदलल्याने सध्या तो बहुतांशी त्याच नावाने ओळखला जातो.
नाशिकहून पहिल्यांदा औरंगाबादला आलो तेव्हा प्रथमच हा दुर्ग नजरेस पडला होता. तेव्हा देवगिरी किल्ला हाच, याची माहिती मात्र नव्हती. कालांतराने गेल्या चार-पाच वर्षांत त्याबद्दलचे आकर्षण अधिकच वाढले. या काळात त्याचे जसे वर्णन ऐकले होते तसाच हा किल्ला आहे. इतिहास डोळ्यासमोर ठेवून तो एक किल्ला म्हणून पहिला तर अधिकच भावतो. कधी औरंगाबादला गेलात तर देवगिरी किल्ला नक्की पाहा... स्वच्छ नजरेने!