माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, April 3, 2019

नांदेडचा भग्न नंदगिरी किल्ला

महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात भुईकोट किल्ले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिकचा भाग वगळला, तर इतर सर्व भागांमध्ये बहुतांश किल्ले भुईकोट आहेत. पूर्वीच्या काळी अनेक शहरांची ओळख की तिथल्या भुईकोट किल्ल्यावरून होती. त्यातीलच एक किल्ला म्हणजे नांदेड चा नंदगिरी अर्थात नंदीग्राम किल्ला होय! नांदेड शहराचे नाव याच किल्ल्यावरून देण्यात आल्याचे मानण्यात येते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा किल्ला वसलेला आहे. अर्थात याच कारणामुळे किल्ल्याची अतिशय दुरावस्था झाल्याचे दिसते. गोदावरीच्या काठावर आज हा किल्ला भग्नावस्थेत आढळलेला दिसतो.  महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचे किल्ले अंगाखांद्यावर खेळवत आहेत, परंतु भुईकोट किल्ल्यांच्या माध्यमातून अतिशय वेगाने आपला इतिहास नामशेष होत असल्याचा दिसतो. आज नांदेडचा नंदगिरी किल्ला महानगरपालिकेच्या पाणी विभागाच्या ताब्यात आहे. तो आता सार्वजनिक ठिकाणी असल्यामुळे आणि एका ओसाड जागी असल्यामुळे त्याची भयानक दुरावस्था झाल्याचे दिसते. आधीच या भागांमध्ये पर्यटन स्थळांची संख्या कमी आहे. त्यातच नागरिकांनी या किल्ल्यांची दुरावस्था केल्यास पर्यटनाला वाव निश्चितच मिळणार नाही..
आमचा पहिलाच कोकणानुभव

कोकण म्हणजे महाराष्ट्रातील सौंदर्याची सगळ्यात मोठी खाण...  कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सगळीकडे फिरायला मिळतं, परंतु अजून पर्यंत एकदाही कोकणात जाण्याचा योग आलेला नव्हता. आजवर फक्त पुस्तकांमध्ये, चित्रपटांमधून, मालिकांमधूनच कोकणचे दर्शन झाले.  परंतु, प्रत्यक्ष जाण्याचा योग मात्र जुळून येत नव्हता. अखेरीस तो योग जुळला. या वर्षी जानेवारीमध्ये कोकणातल्या गणपतीपुळ्याची सहल आम्ही आयोजित केली. जवळपास तीन दिवसांच्या ट्रीपचे पूर्ण नियोजन आम्ही केले होते. पहिल्यांदाच स्वतःची गाडी घेऊन जात असल्यामुळे थोडी धाकधूक तर होतीच परंतु मनाची पूर्ण तयारी केली होती. तसा हा माझा पहिलाच कोकणदौरा नव्हता. सन 2006 मध्ये मी एकदा डिप्लोमाला शिकणाऱ्या मुलांसोबत कोकणात गेलो होतो. पण तेव्हा फक्त मार्गदर्शक म्हणून होतो. यावेळेसची ट्रिप ही खरी ट्रीप होती.
अखेर तो दिवस उजाडलाच. पहाटे पाच वाजता आम्ही पुण्याहून प्रयाण केले. गुगल मॅप सोबतीला होते, त्यामुळे फारशी अडचण वाटली नाही. कराड सोडल्यानंतर रत्नागिरीचा रस्ता चालू झाला. हळूहळू सातारा, सांगली करत कोल्हापूरची सीमा संपू लागली अन कोकणातली हिरवळ हळू-हळू जवळ येऊ लागली होती. घाट रस्त्याची सुरुवात झाली होती.  मी स्वतः पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणातल्या घाट रस्त्यावर गाडी चालवत होतो. पण
सकाळी पूर्ण न झालेली झोप आणि मनावरील ताण यांच्यावर औत्सुक्याने मात केली. कोल्हापूरचे आंबा गाव संपले आणि आंबा घाटाला सुरुवात झाली रत्नागिरी जिल्हा चालू झाल्याची पार्टी तिथे लावलेली होती. घाट सुरू झाला आणि एक शांत वाऱ्याची लहर अंगावरून गेली.  आम्ही कोकणात प्रवेश केला होता. माळशेज नंतर इतका उंच पाहिला मी हा पहिलाच घाट!
हळु हळु गाडी चालवत सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागलो. जिकडे पाहावे तिकडे फक्त झाडीच झाडी आणि डोंगरच डोंगर!!! ती अनुभूती काहीतरी विलक्षण होती मी आजवर केलेल्या प्रवासातला हा सर्वात सुंदर प्रवास होता. झाडी झाडी अन वळणावळणांच्या रस्त्यावर गाडी चालवताना जो आनंद आला होता, तो आजवर मी कधी अनुभवला नव्हता. रत्नागिरी जवळ येत होतं तसं आमची एक्साईटमेंट वाढत होती. जिकडे पाहावे तिकडे नुसती आंब्याची झाडे!! या प्रवासातून कधी बाहेर येऊ नये, असं वाटू लागलं होतं. रत्नागिरीला पोहोचायला अकरा वाजले. मग तिथून प्रवास सुरू झाला गणपतीपुळ्याला. खऱ्या अर्थाने कोकणच्या समुद्रकिनाऱ्याचा प्रवास चालू झाला होता.  समुद्र दृष्टीस पडला आणि डोळ्याचे पारणे फेडले गेले. उंच उंच नारळाची झाडे आणि सळसळणाऱ्या लाटा विलक्षण होत्या. कोकणातल्या गावांची रचना अतिशय सुंदर होती. अशा शांत आणि निवांत वातावरणात राहणाऱ्या लोकांचा आम्हाला हेवा वाटायचा.  नंतरचे दोन दिवस कोकणात भरपूर एन्जॉय केला. परंतु काही कारणास्तव आम्हाला लगेच मागे फिरावं लागलं होतं, त्यामुळे हा प्रवास अपूर्णच राहिला.  कदाचित त्याला पुढच्या वेळेस अपूर्णकात पूर्णत्वास नेण्यासाठी आणखी वेळ असाच वेळ हवा असावा. यावेळच्या प्रवासात गणपतीपुळे मंदिर, समुद्र किनारा, मालगुंड, केशवसुत स्मारक, जयगड किल्ला, जय विनायक मंदिर, उंडी समुद्रकिनारा इतकंच पाहून झालं होतं. एकंदर प्रवासा उत्साह देणारा होता. परतताना मात्र हिरवळीतून कुठेतरी वाळवंटात आल्यासारखं वाटत होतं. ही तर फक्त सुरुवात आहे, कदाचित पुढे अनेक वर्षे याच कोकणाला आम्ही परत जाऊ अशी आशा वाटते...