माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, October 30, 2019

इस्लामपूरची दत्त टेकडी

पुण्याच्या बाहेर कधी जाणे झाले की, आमचा बरेचदा ट्रेकिंगचा शोध घेण्याचाही प्रवास सुरू होतो. इस्लामपूरला आजवर तीन वेळा निरनिराळ्या ट्रेनिंगसाठी जाण्याचा योग आला. त्यातल्या एका भेटीत मी जवळच्या बहेगाव, सागरेश्वर अभयारण्य व मच्छिंद्रगड किल्ला यांना भेट देऊन आलो होतो. त्यावेळेस एक बाईक मला इस्लामपुरात मिळाली होती. पण यावेळेस मात्र काही केल्या बाईक मिळेनात. ट्रेनिंग मधून आलो की, होस्टेलवर स्वस्त बसून राहावे लागायचे. सोलो ट्रेकिंगची सवय बऱ्याच वर्षापासून होती. पण दोन दिवस झाले तरी बाईकची व्यवस्था झाली नाही. म्हणून आता पायीच फिरायचं ठरवलं होतं. त्यासाठी गुगल मॅप प्रथम स्कॅन केला व इस्लामपूरच्या बाहेर एक छोटेखानी टेकडी सापडली. तिचं नाव गुगलवर दत्त टेकडी असं होतं. गुगल मॅप वर तिचं अंतर चार किलोमीटर होतं. म्हणजे जाऊन-येऊन आठ किलोमीटर पडणार! जून महिना चालू असला तरी पावसाचं नामोनिशानही नव्हतं. या वर्षी दुष्काळ वाढल्याची व पाऊस लांबण्याची चिन्हे दिसत होती. बातम्यांमध्ये इतकच ऐकू येत होतं की, पाऊस कर्नाटकापर्यंत आलेला आहे. बाकी इथे सर्व ऊनच पडत होतं. या वेळेच्या इस्लामपूर भेटीत बरेच प्लान्स केले होते. पण बाईक न मिळाल्याने सर्व घोडं अडकलं. शेवटी दत्तमंदिराच्या टेकडीचा पायीच प्रवास करायचं ठरवलं. सकाळी सात वाजता होस्टेलवर निघालो. ऊन फारसं नव्हतं. रस्त्यावर सकाळचे जॉगिंग करणाऱ्यांची मात्र गर्दी होती. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी असं ट्रेकिंगला बाहेर पडणार होतो. पुन्हा एकदा गुगल मॅप च्या साह्याने पायी चालत रस्ता पार करायला लागलो. खरं सांगायचं तर पायी चालताना गुगल मॅप्स वापर बऱ्याच कमी वेळा मी केलाय. त्यातलीच ही एक घटना. जवळपास पंचेचाळीस ते पन्नास मिनिटात मी टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. वर जाण्याचा रस्ता दाखवायला मात्र गुगल मॅपच्या बाईने चुकी केली. वर चढताना मलाच माझा रस्ता तयार करावा लागला होता. उन्हाळ्यामुळे झाडांची नेहमीची वाताहत झाली होती. शुष्कपर्ण सर्वत्र भुईवर पडलेले दिसले. टेकडीच्या टोकावर पोहोचलो तर इथे मी केवळ एकटाच होतो, असं दिसलं. सर्व इस्लामपूर शहर एका नजरेत पाहता येत होते. माझ्या मोबाईलचा कॅमेरा फुटला असल्याने फ्रंट कॅमेराने फोटो काढावे लागले. तसे ते चांगले आलेत. ध्येयावर पोहोचल्याचे समाधान तर वाटत होतेच. पण बऱ्याच दिवसांनी अशी पायपीट केल्याने पाय दुखायला सुरुवात झाली होती. परत चार किलोमीटर अंतर मी किती जड पावलांनी पार केलं, ते माझं मलाच माहित!
या छोटेखानी ट्रेकने मात्र थोडंसं का होईना समाधान प्राप्त झालं होतं.