माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Saturday, November 2, 2019

हुतात्मा बाबू गेनू स्मारक, महाळुंगे पडवळ

पुणे-नाशिक महामार्गावर घोड नदीच्या काठावर मंचर जवळ कळंब नावाचे गाव आहे. या गावातून महाळुंगे पडवळ गावाकडे जाण्यासाठी एक छोटेखानी रस्ता आहे. त्यावर हुतात्मा बाबू गेनू जन्मस्थळ असल्याची कमान दिसते. गेली कित्येक वर्ष ही कमान मी पहात आलो. हुतात्मा बाबू गेनू बद्दल इतिहासाच्या पुस्तकात वाचले होते. परंतु इतके वर्ष बाबू गेनू चे गाव प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नव्हता. त्या दिवशी मी या गावाला व स्मारकाला भेट द्यायचे ठरवले. कळंब गावापासून महाळुंगे पडवळ हे गाव सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे. रस्ता मात्र अतिशय सुंदर आणि दोन्ही बाजुला दाट झाडी आहे. रस्ता सरळ असल्याने कुठे चुकण्याचा संभव येत नाही. गावात पोहोचण्यापूर्वी दोन-तीन ठिकाणी खालील छायाचित्रात दिसत आहेत, अशी क्रांती शिल्पे बनवली आहेत.


शेवटचे क्रांति शिल्प आपल्याला बाबू गेनू सैद याच्या मूळ घराचा व स्मारकाचा रस्ता दाखवते. या ठिकाणावरून उजव्या बाजूला सैदवाडीमध्ये बाबू गेनू चे मूळ घर आजही आहे. तर डाव्या बाजूला महाळुंगे पडवळ गाव आहे. गावात शिरल्या बरोबरच समोरच ग्रामसचिवालयाची इमारत दिसते. तिच्या उजवीकडे जिल्हा परिषद शाळा व डावीकडे हुतात्मा बाबू गेनू स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडते.
अन्य हुतात्मा स्मारकांप्रमाणे याही ठिकाणी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याभोवती सुंदर अशी बाग तयार करण्यात आली आहे. बागेच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर हुतात्मा बाबू गेनू ची क्रांती शिल्पे कोरण्यात आली आहेत. त्यावरूनच हुतात्म्याचे कर्तृत्व आपल्याला प्रतीत होते. प्रत्येक शिल्पा शेजारी माहितीचा फलकही आहे. स्मारकाच्या मध्यभागी मुख्य सभागृह बांधले आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असावेत. बाबू गेनू चा प्राणाहुतीमुळे गावाचे नाव देशभरात पोहोचले. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्या स्मृती खूप चांगल्या रीतीने जपून ठेवल्याचे दिसते.
No comments:

Post a Comment