माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, November 13, 2019

खंडोबा टेकडी, विठ्ठलवाडी

कळंब गावातून चास कडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारणत: दोन किलोमीटर उजवीकडे एक रस्ता टाकेवाडी च्या दिशेने जातो. या फाट्यावर एक छोटेखानी जंगल आहे. विठ्ठलवाडी हे इथले गाव. जंगलातून थोडंसं पुढे गेल्यावर पहिलाच उजव्या बाजूचा वळण घेणारा कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने चार-पाच घरे लागतात यातील शेवटचे घर हे खंडोबा टेकडीच्या पायथ्याचे घर होय. टेकडीवरच्या मंदिराची चावी याच घरात भेटते. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा त्याबद्दल माहिती नव्हती. घरातल्या लोकांनी स्वतः मला चावी आणून दिली होती. त्याच घराच्या मागच्या बाजूने एक छोटी पायवाट या टेकडीवर जाते. फार फार तर दहा मिनिटांमध्ये आपण या टेकडीवर पोहोचतो. टेकडीवर जाण्याकरता मोठा रस्ता बनविण्याचा प्रयत्न झाला असावा, असे दिसते. परंतु, अजूनही तो पूर्णतः कच्चा आहे. टेकडीवर खंडोबाचे छोटेखानी मंदिर आहे. येथून आंबेगाव तालुक्यातला बराचसा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो. कळंब गाव व पुणे-नाशिक महामार्गही पूर्णपणे दिसतो. दुपारच्या वेळेस या टेकडीवरची हवा मात्र आनंदाची झुळूक वाटावी अशीच असते. टेकडीच्या दुसऱ्या बाजूनेही खाली उतरण्यास रस्ता आहे. स्वतःची गाडी घेऊन गेला नसल्यास या ठिकाणावरून उतरण्यास काहीच हरकत नाही.No comments:

Post a Comment