माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, November 19, 2019

चौरंगा दत्त मंदिर टेकडी, पेठ

पुणे-नाशिक महामार्गावरचा सर्वात पहिला बायपास रस्ता तयार झाला होता आंबेगाव तालुक्यातल्या पेठ या गावी! याच गावाच्या मागे दूरवर एक डोंगर दिसतो व त्यावर एक भव्य मंदिरही बांधल्याचे दिसते. हाच चौरंगा डोंगर होय. या डोंगरावर एक दत्तमंदिर आहे. पेठ गावातून एक रस्ता घोडेगाव कडे जातो. या रस्त्यावर उजवीकडे एक पाण्याची टाकी आहे. तिथून डाव्या बाजूला एक फाटा फुटून एक रस्ता भावडी गावात जातो. सदर रस्त्याने पुढे गेल्यावर आपला सौरंगा डोंगराच्या दिशेने प्रवास चालू होतो. हा परिसर बऱ्यापैकी चढाचा परंतु बिनाझाडीचा आहे. सौरंगा डोंगरावर दत्ताचे मंदिर झाल्याने आता थेट वरपर्यंत गाडी जाण्याचा रस्ता तयार केला आहे. पायथ्यापासून डांबरी रस्त्याने थोडे वर गेल्यास एक आश्रम दृष्टीस पडतो. तेथून पुढचा रस्ता कॉंक्रिटचा बांधलेला आहे. मी या डोंगरावर गेलो तेव्हा घाट रस्ता चालू होण्यापूर्वीच गाडी पायथ्याला पार्किंग केली व पायी रस्ता पार करायला सुरुवात केली. रस्त्याची चढण तशी बर्‍यापैकी आहे. परंतु, रस्ता सपाटच असल्याने फारशी दमछाक होत नाही. केवळ तीन वळणांमध्ये कॉंक्रिटचा रस्ता थेट माथ्यावर जातो. पावसाळ्यात येथुन नयनरम्य नजारा पाहायला मिळतो. माथ्यावर दत्ताचे बऱ्यापैकी मोठे मंदिर बांधले आहे. मंदिरात काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर खेड तालुक्यात तर पायथा आंबेगाव तालुक्यात मोडतो. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराचेही असेच आहे. अवसरी घाटापासून खेड घाटात पर्यंतचा व बहुतांश आंबेगाव तालुक्याचा परिसर येथून न्याहाळता येऊ शकतो. डोंगरावर फारशी झाडे नसल्याने उन्हाळ्यात वैराण अवस्था पाहायला मिळते.No comments:

Post a Comment